ढिसाळ नियोजनामुळे रस्ते पुन्हा जलमय   

लोहगाव : सतत पडणार्‍या जोरदार पावसामुळे लोहगाव वाघोली रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून, अनेक ठिकाणच्या रस्त्यावर कंबरे इतके पाणी साचलेले आहे. बस आणि चारचाकी वाहन चालकांना या पाण्यातून वाट काढताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. मात्र, प्रशासनाकडे तक्रार करून ही दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करण्याची मागणी केली आहे.
 
अगोदरच पूर्व मोसमी पावसाने परिसरात दाणादाण उडविली. त्यानंतर सोमवारी मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सुरू असलेल्या वडगावशेरी मतदारसंघासह शिरूर मतदारसंघातील वाघोली आणि परिसरात पावसाने हाहाकार उडविला आहे. सर्वत्र रस्त्यावर पाणी साचत आहे. नाले तुंबल्याने रस्त्यावर तळे साचले आहे. या परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येरवडा, नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील पावसाळी वाहिन्या, नाले सफाईच्या कामाची पोलखोल होऊन बोजवारा उडाला आहे. 
 
वडगावशेरी, कळस, धानोरी, लोहगाव, पूर्व भागात सोमवारी दुपारनंतर जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे सखल भागात पाणी साचले. लोहगाव - वाघोली रस्ता कर्मभूमी नगर, लोहगाव मुख्य बस थांबा, खराडी, वडगावशेरी, चंदननगर, तसेच  येरवडा गुंजन चौक, डॉ. बाबासाहेब आबंडेकर वसाहत येरवडा, सर्व्हे ऑफ इंडिया येरवडा-टिंगरेनगर रस्ता, विमानतळ रस्ता या ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांचे ये-जा करताना त्रास होत आहे. पाऊस थांबल्यानंतरही मुख्य रस्त्यांवर पाण्याचा निचरा होत नाही. महापालिका अधिकारी व कर्मचारी लक्ष देत नसल्याने नागरिकांनी महापालिका प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. साचलेल्या पाण्यातूनच वाहन चालक आणि पादचार्‍यांना वाट काढत जावे लागत आहे. 
 
महापालिका प्रशासनाने सांडपाणी वाहिनीचे काम खाजगी कंपनीकडे दिल्याने ती कामे चांगली झालेली नाहीत. शिवाय महापालिकेतील अधिकार्‍यांचा ठेकेदार आणि कर्मचार्‍यांवर वचक राहिला नाही. महापालिका कोट्यवधी रूपयेचे काम करत आहेत. मात्र, छोट्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेची निवडणूक लांबल्याने नागरिकांना कोणी वाली राहिलेला नाही. प्रशासानाच्या ढिसाळ कारभामुळे सामान्याचा बळी जाऊ नये. यापूर्वीच खबरादारीने  रस्त्यावरील पाण्याचा निचारा व्हावा, खड्यांची दुरूस्ती करावी, पावसाळी कामे त्वरीत न केल्यास  प्रशासनाच्या विरोधात लोहगावकरांकडून जल आंदोलन उभारण्यात येणार.
 
प्रतिम खांदवे,  (लोहगाव माजी उपसरपंच) 

Related Articles